माधव उद्या रविवार आपण माधवीला भेटणार आहोत, या कल्पनेने सुखावत होता. रात्रीचे जेवण करून माधव विचार करत होता. उद्या आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल, जेव्हा माधवी समोर येईल. प्रथम भेटीत ती काय म्हणेल. असे नाना प्रकारचे विचार त्याच्या मनांत येत होते. नवीन यौवनात उत्साह नैसर्गिकरीत्या उफाळत असतो. नव प्रेमिकांचा उत्साह म्हणजे दरदिवशीची कोजागिरी पौर्णिमा, कलेकलेने तोच चंद्रमा नभात असे वाटावे. हे वयच असे असते. अध्यात्मिक भाषेत बोलायचे तर मोह मायेच्या वलयातील एक आकर्षण, फसवे आहे. क्षणिक आहे पण विलक्षण प्रभावी असते. मोह-मायेचे विविध पदर आणि पाश ज्याला समजले, तो प्रेमाची खरी व्याख्या समजू शकतो. प्रेम या शब्दाची व्याप्ती समजू शकतो.
माधव आणि माधवी ही या प्रेमातले प्यादे आहेत, नियती कशी नाचवेल हे त्यांना तरी कसे ठावे असावे? प्रेमाची खरी व्याख्या त्यागामध्ये दडलेली आहे. जसे की आईचे प्रेम. आपल्या संसार आणि पोरा-बाळांसाठी त्याग करणारी प्रेमस्वरूप मूर्तीच आहे. मग माधव आणि माधवी यांचे प्रेमस्वरूप काय असावे? शारीरिक, आर्थिक की वयात येणारी वासना. ठराविक शारीरिक वासना भोगल्यानंतर प्रेमाचं स्वरूप पूर्वीसारखं राहू शकतं? ते तर शारीरिक वासनारूपी प्रेम ठरेल. आर्थिक मोहापायी असणारे प्रेम तर अतिशय धोकादायक आहे. एकतर्फी प्रेम मानसिक दगाबाज ठरू शकते. तर अनेक प्रेम प्रकरणे केल्याने काल-कूट स्वरूप नैराश्य जहररुपी बनून जीवनात संभ्रमावस्था उत्पन्न करते. या काही मोह-मायेच्या चौकटी आहेत, ज्या नाशिवंत आहेत. याला आरपार भेदून खरे प्रेमस्वरूप हे आध्यात्मिक त्याग रूपात आहे.
माधव तयारी करून घराबाहेर पडला. पहिली भेट म्हणून त्याने वॉलेट चेक केले. त्याला ऐकून माहीत होतं, मुलींना पहिल्या प्रेमात इंप्रेस करायला शॉपिंग आणि फिरायला आवडते. त्यासाठी वॉलेट गरम ठेवावे लागते. त्याने रेल्वे स्टेशन गाठले. एक अर्ध्या तासानंतर तो पोहोचणार होता. भेटण्याच्या उत्सुकतेने तो मनांत अधीर झाला होता. पहिल्या भेटीत माधवीला कसे इंप्रेस करावे याचा विचार त्याच्या मनांत चालला होता. इतक्यात त्याचा मोबाईल आवाज करू लागला. त्याने रेल्वे गर्दीतून मोबाईल खिशातून बाहेर काढला. माधवने पहिले माधवीचा कॉल होता. पण खूप गर्दी असल्याने त्याला बोलता येत नव्हते. रेल्वे डब्यात रविवार असल्याने नेहमी सारखीच गर्दी होती. माधव विचारात पडला माधवी आपल्या अगोदर तर पोहोचली नसेल ना?
माधव आपल्या इच्छित स्टेशनवर उतरला, त्याने प्रथम मोबाईल काढून माधवीचा नंबर टच केला. रेल्वेच्या पायऱ्या चढत तो मोबाईल रिसिव्ह व्हायची वाट पाहू लागला. माधवीने फोन कॉल उचलला होता.
माधव: माधवी , हॅलो
माधवी: हो, माधव निघालेच आहे, बस मध्ये आहे, थोड्याच वेळात पोहोचते.
माधव: ओके, माधवी ड्रेसचा कलर कोणता आहे?
माधवी: पिंक कलर टॉप आहे, माधव फोटोत पाहिलंय ना माझा.
माधव: हो हो पाहिलंय, पण ओळखायला सोप जावं म्हणून कपड्यांचा कलर सोयीचं आहे. ठीक आहे मी रेल्वे स्टेशनवर पोहोचलाय, आता बस स्टॉपवर चाललोय, मी बस डेपोच्या एन्ट्री जवळ उभा राहतो म्हणजे भेटायला सोपं होईल.
माधवी: ठीक आहे माधव, मी पोहोचते थोड्या वेळात.
माधव रेल्वे स्टेशनच्या बाहेर आला, बाजूलाच एक चहाची टपरी दिसली. माधवी पोहोचे पर्यंत चहा पिण्यात वेळ निघून जाईल. तिथून माधवला बस डेपो एन्ट्री सहज दिसत होती. माधवी त्या एन्ट्री जवळचं येणार होती, त्यामुळे माधव तिथूनच तिला पाहण्याचा विचार करत होता. काही बसेस एन्ट्री करत होत्या, त्यात माधव माधवीला पाहण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्यक्ष पाहण्यात ,पण प्रत्यक्षा हून प्रतिमा उत्कट असते, असे माधवला वाटत होते. कुठे एखाद्या युवतीचा ड्रेस पिंक दिसला की माधवचे डोळे विस्फारत होते. फोटोतील माधवी त्याला उत्सुकते च्या झुलव्यावर झुलवत होती. मनाने हळव्या झालेल्या श्वासा चे हळुवार स्पंदन माधव अनुभवत होता. वाऱ्यापेक्षाही मनाची स्पंदने अधिक वेगाने धावतात , आणि इच्छित स्थळावर झेपावत असतात. माधवचेही असेच झाले होते, मनाची विलक्षण चलबिचल त्याला जाणवत होती. प्रत्येक येणाऱ्या बसवर माधवचे मनाचे उत्कटतेने भाव आदळत होते. मनाच्या लाटा उसळत होत्या, आणि किनाऱ्यावर येण्यासाठी झेपावत होत्या.
माधव टपरीवरचा चहा पीत असताना, अचानक एका आतमध्ये जाणाऱ्या बसमध्ये पिंक कलर त्याला दिसला, थोडा दचकला आणि भांबावलेल्या नजरेने माधव जास्त उत्कटतेने बस न्याहाळू लागला. त्याची खात्री झाली की ती माधवीच आहे. माधव ची नजर त्या आतमध्ये जाणाऱ्या बसचा पिच्छा करत होती. माधवला टपरीवरून ती बस सहज नजरेच्या टप्प्यात येत होती, त्यामुळे माधवने ठरवलं इथूनच पहायचं की ती माधवीच आहे की आणि कोणी. माधवचा मोबाईल फोन वाजू लागला, आता तर त्याला खात्रीच पटली की माधवीचा कॉल असणार. माधवने कॉल उचलला नाही आणि बसवरून नजर पण हटवली नाही. त्याला पहायचं होत की माधवी दुरून कशी दिसते, त्यामुळे तो दुरूनच तिला न्याहाळणार होता. त्याच्या मनाची धडधड वाढत होती. बसमधून प्रवासी उतरत होते, आणि तो पिंक कलर खाली उतरत होता. माधवच्या भावना उफाळत होत्या.
माधवी बसमधून खाली उतरली आणि तिची नजर माधवला शोधू लागली, पण आसपास तिला कुठेच माधव दिसत नव्हता. तिने फोन ओपन केला, हे सर्व माधव दुरून पाहत होता. तो काही क्षणापुरता मोहरुन गेला होता, माधवी खूपच सुंदर वाटली त्याला, त्या पिंक कलर मध्ये ती आणखीनच खुलून दिसत होती. ती One look नव्हतीच, परत परत पहावी अशीच वाटत होती. काही स्त्रियांचं सौंदर्य हे असं पाहण्यासारखे असते. अर्थात सौंदर्य आणि मन हेही तितकेच सुंदर असावे, तरच त्या सौंदर्याला अर्थ प्राप्त होत असतो. माधव हळूहळू घायाळ होत चालला होता. माधवपण सुंदर होता दिसायला, पण माधवीच्या सुंदरतेपुढे तो फिका पडू लागला होता. पण पुरुषांच सौंदर्य हे शारीरिक न पाहता ते त्याच्या पराक्रमावर दिसून येते. पुरुषांच शौर्य हेच त्याच सौंदर्य ठरते.
आता माधवला राहवत नव्हते, तो टपरीवरून पुढे झाला, फोटोतला माधवीचा सुंदर चेहरा आता प्रत्यक्षात तिच्याशी स्पर्धा करू लागला होता. फोटोतल्या पेक्षा ती जास्त सुंदर वाटत होती. माधव हळूहळू बसकडे जाऊ लागला, आणि माधवीची नजर त्याच्याकडे गेली. माधवीने मोबाईल तसाच ठेवत माधव कडे पाहत हास्य केले. त्या एका स्मित हास्याने माधव स्वर्ग सुख प्राप्त करत होता. माधव आणि माधवी दोघेही एकमेकांकडे खेचले जात होते. दोघांचे डोळे एकमेकांना भिडत होते, मनाच्या लहरी एकमेकांवर आदळत होत्या. पौर्णिमेचा चंद्र दर्याला उसळवत होता. मनाच्या सागर लाटा काठांवर यायला उतावळ्या झाल्या होत्या. माधवने भानावर येत आपल्या मना वर लगाम ठेवत हात पुढे केला आणि माधवीने त्याला हात पुढे करत प्रेमाची सलामी दिली. दोघांनीही काही क्षण रेंगाळत हात त्याच स्थितीत ठेवत पावले टाकायला सुरुवात केली.
क्रमशः
0 टिप्पण्या