नर्मदा परिक्रमा
Narmada Parikrama
नर्मदा परिक्रमा आणि आपले जीवन यांची सांगड घातली तर आपल्या लक्षात येईल की आपले आयुष्य ही पण एक परिक्रमा आहे. नर्मदा परिक्रमा करताना आपल्याला खडतर परिस्थितीत सामना द्यावा लागतो, तसेच काहीसे आपल्या जीवनाच्या प्रवासात घडतं. परिक्रमा करताना जो दिवस जसा येईल त्यात धन्यता मानून घेण्याची सवय करावी लागते. आपल्या रोजच्या जीवनात पण आपल्याला अशी सवय करून घ्यावी लागते. आपल्या संसारी जीवनात असे कित्येक प्रसंग येतात, तेथे आपल्याला झुंजावे लागते. तडजोड करावी लागते. म्हणजेच परिक्रमा करताना नर्मदा माता आपल्याला हेच शिकवत असते, रोज दरदिवशी येईल त्या प्रसंगाला परिस्थितीला सामोरे जा, आणि पुढे चालत राहा हाच तो संदेश आपल्या संसारुपी जीवनास लागू पडतो.
नर्मदा परिक्रमेची ही सांगड जर आपण आपल्या जीवनाशी जोडली, तर आपण पण रोज परिक्रमेत (संसारुपी) आहोत असा भास निर्माण होऊ शकतो. हा परिक्रमा आभास आपल्या जीवनास उपयोगी ठरू शकतो. संसारातील अडचणीच्या वेळी आपल्या मनात स्थिरता निर्माण करू शकतो. मन स्थिर होऊन येईल त्या प्रसंगास तोंड देण्याची ऊर्जा आपणास मिळते.
नर्मदा परिक्रमा करताना रोज कित्येक प्रसंगांना सामोरे जावे लागते, पण त्यावेळेस आपण आपल्या बरोबर आपली नर्मदा माता आहे, हा जो विश्वास आपल्यात निर्माण होतो तो महत्वाचा असतो. जे काही होईल ते माझी नर्मदा माता पाहून घेईल, असा आपल्या मनात विश्वास निर्माण होत असतो. जे काही होणार आहे ते नर्मदा मातेस माहीत आहे, असे आपण आपल्या मनावर बिंबवत असतो, आणि परिक्रमेत पुढे चालत राहतो.
आता आपल्या संसारात पाहू, रोजचे जीवन आपण जगत असतो. पण येथे आपण स्वतःला करता करविता समजत असतो. हाच तो फरक आहे. जे काही होत आहे ते मी करत आहे. हा मी पणाचा भाव तेथे दडलेला असतो. याच्या उलट नर्मदा परिक्रमेत आपण सर्व नर्मदा माते वर सोपवलेले असते. जे काय करायचं ते नर्मदा माता करून घेईल हा भाव परिक्रमेत असतो. त्याच्या उलट आपल्या रोजच्या जीवन परिक्रमेत आपण, जे काही करणार आहे ते मी करणार आहे, हा भाव असतो. येथेच आपण फसतो, आणि फसल्यानंतर अंगाशी आल्यावर नर्मदा मातेकडे धाव घेतो. असा काहीसा प्रकार आपल्या जीवनात घडत असतो.
संसार चोख व्यवस्थित असतो, तो पर्यंत आपण निर्धास्त असतो. आणि काही अडचण आली की आपण आपल्या देवा कडे धाव घेतो. त्यापेक्षा त्या नर्मदा मातेचा आधार घेत संसार केल्यास ती तुम्हाला अडचणीत येऊ देणार नाही, कारण तुम्ही सर्व तिच्यावर सोपवलेले असते. ती तुम्हाला कशी पडू देईल? निश्चितच ती त्या प्रसंगात तुम्हाला तारून नेईल.
नर्मदा परिक्रमेत असताना, आपण आपला सारा भार नर्मदा मातेवर टाकलेला असतो, त्यामुळे कुठे पडण्याची भीती नसते, ती सांभाळत असते. असा काहीसा भाव आपल्याला आपल्या संसारात ठेवावा लागेल, माझा संसारगाडा माई चालवत आहे. तिच्या कृपेने मी संसार परिक्रमा करत आहे, असा भाव आपल्या ठायी निर्माण झाला पाहिजे. पण सहसा हा भाव आपल्यात नसतो, येथे मी पणाचा अहंकार आपल्यात असतो. जे काही होत आहे ते मी आहे म्हणून, हा भाव असतो.
जसे एखादे लहान मूल नुकतेच चालायला शिकते. त्याची आई त्या लहान मुलाचा हात सोडत नसते, कारण बाळ पडेल ही तिला भीती असते. पण ते लहान मूल तिचे हात झटकून, एकटेच चालण्याचा प्रयत्न करते. काही पावले टाकल्यावर ते लहान बाळ अडखळत पडते. आई पुन्हा हातचा आधार देत त्या बाळास सावरते. पुन्हा ते बाळ आईचा हात झटकून एकटेच चालण्याचा प्रयत्न करते. आता आई थोडी परीक्षा घेते, ती त्याला एकट्याला सोडते, आता ते बाळ जोरात चालण्याचा प्रयत्न करते, पण पहिल्यापेक्षा ते जोरात पडते. त्याला थोडे खर्चटते आणि रडत ते आपल्या आईकडे पाहते. आई पुढे होऊन त्याला कडेवर घेते.
आपले काहीसे असेच आहे, त्या लहान मुला प्रमाणे आपण एकटेच संसार चालवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि सपाटून मार खाल्ल्या नंतर त्या आईकडे मदतीची याचना करतो. आई तेच सांगत असते, एकटे नको चालू बाळा पडशील, माझा हात धर. पण आपण त्या लहान मुला प्रमाणे आईचा आधार न घेता संसारात एकटेच धावत असतो. तिचा हात धरून संसार केल्यास पडण्याची काय भीती?
आता इथे आपण नर्मदा माता हिचा आधार घेत परिक्रमा करत असतो, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ती आपल्याला आधार देत असते. आपण आपल्या संसारुपी परिक्रमेत तिचा हात धरून संसार केल्यास ती आपल्याला आधारच देईल, (इथे आपण आधार 'शक्ती' स्वरूपात पाहू, जी unknown आहे), ती पडू देणार नाही. असा भाव आपल्या जीवनात असला पाहिजे. आपल्या संसारी जीवनास आपण ती एक 'परिक्रमा' आहे असे समजून वागले, तर फार मोठे स्थैर्य निर्माण होईल.
नर्मदे हर हर!
0 टिप्पण्या