माधव येत्या रविवारी माधवीला भेटण्यासाठी उत्सुक झाला होता, कित्येक रात्री फोटो पाहून भेटण्याची स्वप्ने पाहत होता. हे वयच असे असते, तारुण्याची उर्मी उफाळून दर्याला भरती यावी असे वाटावे. फेसाळ समुद्राला पण कुठेतरी काठ गाठावा लागतोच. ही नैसर्गिक ओढ सगळी कडे सारखीच असते. त्याला माधवी आता सर्व सिने-सौंदर्यात दिसत होती. हा माधवचा एकतर्फी प्रेम प्रवास वाटत होता. कारण माधवीच्या अंतर्मनाचा ठाव अजून त्याला लागला नव्हता, तसे पाहिले तर जगातल्या कोणत्याच स्त्रीचा ठाव लागत नसतो. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृती आणि तितकेच तर्क प्रत्ययास येतात. शब्दाच्या संदर्भात अनेक तर्क लावता येतील. तसेच तिच्या मनाविषयी अनेक तर्क लावता येतील. ब्रह्मदेवाला पण तिच्या मनाचा ठाव लागणार नाही, अशी ही विलक्षण प्रभावी मानवी देह कलाकृती निर्माण केली. माधवला पण माधवीच्या मनाचा ठाव कसा लागावा?
माधवच्या मनांत पण प्रेमाच्या लहरी उठत होत्या. मनाच्या लहरींना सुद्धा कुठेतरी काठावर न्याव लागतं. मनास कोणत्या काठांवर नेऊन शांत व्हावे हा ज्याचा त्याचा मानस आहे. माधव पण अपवाद नव्हता, कधी कधी भावना एवढ्या उफाळून याव्या की त्याला वाटे, आत्ताच माधवीस जाऊन भेटावे आणि मन मोकळे करावे. स्वाभाविक या नैसर्गिक मानवी संवेदना आहेत. त्याला मोबाईलवर माधवीशी बोलण्याची इच्छा होत होती. त्याने मोबाईलवर तिचा नंबर काढला, पण रात्रीच्या जेवणाची वेळ झाली असेल म्हणून त्याने बोलणे टाळले. माधव तिचे मन सांभाळून वागत होता. कारण मनातून ती त्याला आवडत होती. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तींना त्रास होईल असे कोणी कधी वागत नाही.
माधवच्या मनात प्रेमाच्या लहरी तरंगत राहिल्या, पण त्या लहरींना किनारा दिसत नव्हता. त्याला वाटत होतं, प्रेम म्हणजे केवळ व्यक्त करणे नव्हे, तर दुसऱ्याच्या शांततेला समजून घेणे. माधवीबद्दल त्याच्या मनात जे प्रेमाच वादळ निर्माण झालं होतं ते केवळ आकर्षण नव्हतं, ते एक गहिरं, स्थिर आणि प्रामाणिक प्रेमाच्या लहरींच भावविश्व होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ठरवलं, आज काहीतरी बदल घडवायचाच. त्याने फोन हातात घेतला, पुन्हा माधवीचा नंबर उघडला, पण बोटं अंक टाइप करण्याआधीच थबकली. तो विचार करू लागला — “काय बोलू मी तिच्याशी? साधं ‘कशी आहेस?’ म्हणू का? की थेट सांगू, की तुझ्याशिवाय दिवस फिके वाटतात?” पण मग पुन्हा तो स्वतःलाच थांबवू लागला. प्रेम कधी कधी बोलल्यावर हरवून जातं असं त्याचं मत होतं. जास्त बोलण्यातून शब्द 'भावनांना' फिके करत जातात असाही त्याच्या मनाचा भास होत होता.
माधवचं प्रेम व्यक्त झालं नाही, पण ते हरवलंही नाही. ते न बोललेलं प्रेम त्याच्या प्रत्येक विचारात, प्रत्येक नजरेत जिवंत होत होतं. त्याला आता हे उमगलं होतं की प्रेमाचं खरं सौंदर्य त्याच्या अपूर्णतेत आहे. जे अपूर्ण राहिलं, त्यालाच मन सतत जपून ठेवतं — अपूर्णतेतच पूर्णत्वाची ओढ असते. कारण पूर्ण झालेलं प्रेम शेवटी सवयीसारखं होतं, पण अपूर्ण राहिलेलं प्रेम आयुष्यभरासाठी प्रेरणा देतं राहत.
आणि त्या रात्री पुन्हा एकदा चंद्र उगवला. त्याच्या मंद प्रकाशात माधवने खिडकीतून बाहेर पाहिलं — जणू आकाशाच्या पल्याड कुठेतरी माधवीही त्या चंद्राकडेच पाहत असेल, दोघांच्या मनातील वादळ या एकाच ठिकाणी स्थिरावते की काय असे वाटावे. आणि त्यांच्या दोघांच्या नजरा या निःशब्द चांदण्यात भेटत असतील. असे भावनिक प्रेमाचे कल्लोळ त्याच्या मनांत उठतं होते. प्रेमाच्या भावना किती तीव्र असू शकतात, हे आपण कवी मनातून या गीतात उतरलेले ऐकू शकतो. "पंख हो तीत उड आती रे" सुंदर प्रेमाची भावना वायूवर स्वार होऊन उडू शकते.
प्रेम हा शब्द उच्चारायला जितका सोपा, तितकाच त्याचा अर्थ गाठायला अवघड. शब्दांच्या मर्यादेत अडकवता न येणारी ही भावना, काळाच्या ओघातही नव्याने उमलत राहते. माधवीच्या मनात त्या क्षणी प्रेमाच्या धगेला जाग आली होती. समोर दिसणाऱ्या दृश्याने तिच्या अंतरमनात अस्वस्थतेची लाट उसळली, आणि नकळत तिच्या ओठांवर "शिकलेली बायको" या चित्रपटातील गाण्याचे बोल डोलू लागले. प्रेम — ही भावना जितकी गूढ तितकीच बहुरंगी. तिच्या किती व्याख्या असतील, किती रूपं, किती तऱ्हा — हे कोणी सांगावे? प्रत्येक मनुष्य आपल्या अनुभवांनुसार प्रेमाची नवी व्याख्या घडवतो.
प्रेमाची चौकट प्रत्येकासाठी वेगळी. कोणी त्यात स्वतःला हरवतो, तर कोणी त्यातून स्वतःला ओळखतो. कोण कोणत्या चौकटीत अडकतील, हे फक्त त्या दोन प्रेमिकांनाच ठाऊक असते. समाज, संस्कृती, परंपरा या सर्व प्रेमाच्या किनाऱ्यांवर उभ्या राहून त्याला आकार देतात, याचं संस्कृती, परंपरेच्या चौकटीत कित्येक प्रेमाच्या आहुती पडलेल्या आहेत. प्रेमाच्या मागे जर वासना दडलेली असेल तर ते प्रेम नव्हेच, त्यागातून खरे प्रेम निखरते, मूळ प्रेमाचा गाभा तिथे आहे. आपल्या आईचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम, या प्रेमाला तोडच नाही. स्वार्थात खरे प्रेम त्याच्या गाभ्याशी पोहोचत नाहीत. कारण प्रेम हे शब्दांचे नाही, तर अनुभूतीचे द्योतक आहे. ज्याने त्याला प्रत्यक्ष जगले, तोच त्याची खरी ओळख सांगू शकतो.
माधव मात्र त्या प्रेमाचा शोध घेताना तर्क वा कसोटी लावणारा नव्हता. त्याचा स्वभाव सोन्याला घासून पाहणारा नव्हता — तो जेव्हा प्रेम करतो, तेव्हा पूर्णपणे झोकून देतो. त्याच्यासाठी प्रेम म्हणजे मोजमापाची गोष्ट नाही, ती तर आत्म्याचा निखळ प्रवाह आहे. त्याला शब्दांची मांडणी जमली नाही तरी भावना मात्र ओसंडून वाहतात. शब्दांत न मावणारी भावना, हाच तर प्रेमाचा खरा गाभा आहे. त्याचे रूपांतर दोन डोळ्यांतील अश्रूंमधून भावनांचा आवेग दृष्टीस पडतो.
माधवीकडे पाहता तो विरोधाभास अधिक प्रकर्षाने जाणवत होता — एकीकडे ती विवेकी, विचारशील, शिकलेली स्त्री; तर दुसरीकडे तिच्या मनात दाटून आलेली कोवळी भावना. स्त्रिया या भावनेच्या खेळात वरचढ ठरतात, कारण त्या भावनेला शब्दांपेक्षा अनुभूतीतून व्यक्त करतात. त्यांच्यासाठी प्रेम हे केवळ प्रणय नसतो; तो संवेदनांचा, समर्पणाचा आणि त्यागाचा संगम असतो. त्यामुळे प्रेमाला व्यक्त करण्यासाठी त्यांना वेळ लागतो, कारण त्यांचे प्रेम साकार होताना अनेक भावनांच्या थरातून प्रवास करत असते.
जर प्रत्येकाने प्रेमाचे सोने घासून त्याची किंमत तपासायची ठरवली असती, तर मोह-मायेच्या प्रेमातून शकुंतलेचा जन्मच झाला नसता, न मेघदूत लिहिला गेला असता. प्रेम हे चिरंतन आहे, कारण ते तर्कावर नव्हे तर अंतःकरणावर आधारलेले आहे. या प्रेमाच्या विविध रूपांमध्ये स्त्री वरचढ आणि त्याग करण्यात श्रेष्ठ ठरली आहे.
माधवचे प्रेमही तसेच — त्यात न कसोटी आहे, न अपेक्षा. तो भावनेच्या पलीकडील एक प्रवास करतोय, जिथे शब्द अपुरे पडतात आणि फक्त नजरा बोलतात. माधवीला हे उमजत होते, आणि म्हणूनच तिच्या मनात गाण्याच्या ओळी उमलत होत्या. प्रेम ही अशीच अनुभूती — जी एकदा हृदयात जागी झाली, की शब्दांची, तर्कांची आणि मर्यादांची गरज उरत नाही. आणि अमर्यादाचे कुंपणही ओलांडता येत नसते. खास करून स्त्रियांना काही मर्यादा नैसर्गिक असतात.
कारण प्रेम हे बोलायचे नसते, शब्दांत तोलायचे नसते , ते फक्त जगायचे असते.
आणि तिकडे माधवी पण प्रेमाच्या तीव्रतेची धग उमजत होती, नवं यौवनात प्रेमाची ओढ काही औरच असते. नकळत उमलत असते, आणि भावनेची काठ पकडून हिंदोळत असते. माधवीमध्ये या भावना उत्तेजीत होत होत्या. तिला पण माधवला भेटण्याची ओढ लागली होती. माधवीने त्यासाठी खास तिला आवडता ड्रेस काढून ठेवला होता. पण तिच्याही मनांत द्विधा स्थिती होती. घरांत सांगून जावं की नाही, सांगितले तर घरच्यांची काय प्रतिक्रिया येईल, याचा तिला ठाव लागेना. पण तिने मनोमन निश्चित केले की माधवला भेटायचे. मैत्रिणीकडे जायचं असे घरी सांगण्याचे तिने ठरविलं. तिने माधवला कॉल करून सांगण्यासाठी मोबाईल उचलला आणि रिंग डायल केली.
माधवी: "हॅलो, माधव"
माधव: "हॅलो , हा बोल माधवी".
माधवी: "माधव, उद्या नक्की जायचं आपण फिरायला. मी येते बस स्टँडवर. तुमच काय ठरतंय"? माधवीने बोलताना कोणी ऐकत नाही ना याची काळजी घेतली होती, कारण या गोष्टीला घरातील मान्यता देणार नाहीत, हे गृहीत धरलं होत.
माधव: "हो, हो मी येतोय उद्या, आपण स्टेशन वरील बस स्टँडवर भेटू. माधवी तू बस स्टँडवर पोहोचण्या आधी मला कॉल कर. आणि ड्रेसचा कलर सांग, म्हणजे भेटायला सोप जाईल. प्रथमच भेटतोय आपण. तुझा फोटो पाहिलाय मी, पण सोपे होईल."
माधवी: "हो, सांगते. पण माधव मी घरच्यांना सांगून येणार नाहीये. मैत्रिणीकडे जाते असे सांगणार आहे. घरचे परवानगी देणारं नाहीत. लग्नाआधी त्यांना आवडणार नाही हे, असे भेटणं."
या सर्व बोलण्याने दोघांच्याही हृदयातील कप्पे हळुवार उमलत होते, भावनांचे कोमल स्त्राव पाझरत होते.
क्रमशः
0 टिप्पण्या