प्रीत तुझी माझी
माधव आणि माधवी या दोन जीवांची ही एक प्रेम कहाणी आहे. नियती काही वेळेस जीवनाचे नियोजन करताना चुकते की काय असे वाटते. नियती आणि प्रारब्ध यांचा केव्हा केव्हा मेळ बसत नाही. पण नियती आणि प्रारब्ध ही एकमेकांची समान रूपे आहेत. नियती (ठरलेले जीवन) आणि प्रारब्ध (ठरलेल्या जीवनाचे भोग) यांना 'प्रेम' हा साधणारा एक दुवा ठरू शकतो. प्रेमाची व्याख्याच मुळी 'त्याग' या शब्दात असावी, या कथेत माधव सर्वस्वी त्यागी प्रेम वृत्ती धरून आहे, आणि माधवी ही स्त्रीत्व आणि लोकांभिमुख विचार या दोन्हीत सापडलेली दिसते.
माधव आज ऑफिसमधून लवकर घरी परतला, कारण सकाळी आईने त्याला लवकर घरी येण्यास बजावले होते, मुली कडील पाहुणे येणार होते, माधवसाठी एक स्थळ येणार होते. प्रथम स्थळ आणि लग्न याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. माधव पण उत्सुक होता. ज्याप्रमाणे मुले- मुली भावी आयुष्याची स्वप्ने रंगवतात, तीच उत्सुकता माधवला पण होती. मुलगी कशी असेल, कशी दिसत असेल? असे नानाविध विचार त्याच्या मनांत येत होते. पाहुणे माहितीतील होते, पण माधवने मुलीला अजून पहिले नव्हते.
सायंकाळी मुलीच्या घरची मंडळी माधवच्या घरी आले, माधवच्या घरी आई, बहीण जी सासरहून खास आली होती. मोठा भाऊ आणि त्याची मिसेस असे सर्वजण गप्पा मारत होते. जुन्या ओळखींना ताज्या करण्याचा सर्वजण प्रयत्न करत होते. संबंधींचे उणे-वजा काढले जात होते. त्यात महत्वाचे म्हणजे दोन्ही कडील मंडळी सकारात्मक बोलणे कसे होईल याची काळजी घेत होते. हे चित्र बहुतेक सगळीकडे दिसते. जास्ती करून मुलीकडील मंडळी मुलगी कशी योग्य आहे, हे पटवण्याचा प्रयत्न करतात.
'भाव-बंधन' नाटकामध्ये जशा इंदू आणि बिंदू एकमेकी पेक्षा उजळ पणात कशा श्रेष्ठ आहेत, असाच प्रकार सगळीकडे असतो. उणे पणाला येथे वाव नसतो, अगदी कोळशा वरील काजळची रेषा किती छान दिसते, इथ पर्यंत सकारात्मकता दडलेली असते. सगळ कसं आलबेल आहे आस वाटत.
मुलीकडील मंडळी वार्तालाप करून, निघून गेली. जाताना त्यांनी मोबाईल नंबर न चुकता दिला. जेणेकरून मुलाला आणि मुलीला बोलता यावं हा त्यासाठीचा उद्देश. माधवला पण त्या मोबाईल नंबर ची उत्सुकता लागली होती. तिचा आवाज कसा असेल, ती आधुनिक कॉलेज कुमारी असेल की जुन्या चालीरितीने, जुन्या काळात रमणारी असेल, असे बरेच विचार माधवच्या मनात येत होते.
माधव दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेला, पण एकसारखा मोबाईल नंबर त्याच्या नजरेसमोर येत होता, त्याने न चुकता तो टिपून घेतला होता. काही म्हणा पण ज्याचं लग्न होणार असते, तोही सुरुवातीला फोन करण्यास चाचपडतो हे सत्य. माधव पण त्याला अपवाद नव्हता. पण आज माधवचे मन थोडे अर्धवट स्थितीत होते. कारण एकच 'नव-वधू'.
माधव सकाळ पासून कित्येक वेळ 'तो 'नंबर न्याहाळत होता, आता तो नंबर पुन्हा पाहून त्याच्या तोंडपाठ व्हायला आला होता. पण धीर होत नव्हता. आणि शेवटी त्याच्या मनातली काहूर संपली. त्याच्या मोबाईलवर रिंग वाजत होती. त्याने भानावर येत मोबाईल पाहिला, आणि त्याला सुखद धक्का बसला, त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि विस्मय दोन्हीचे मिश्रण दिसत होते. तो तोच नंबर होता, ज्याची तो वाट पाहत होता.
माधवने मोबाईल टच केला, आणि पलीकडून आवाज आला,
हॅलो, माधव बोलत आहात का ?
हो, हो मी माधव बोलतो आहे.
कसे आहात?
माधव : हो मी बरा आहे, पण आपण कोण बोलत आहात?
"मी माधवी , काल तुमच्याकडे आमची पाहुणे आले होते ना."
माधव उडालाच, क्षणभर त्याला काय बोलावे समजेना,
माधव : माधवी, म्हणजे काल जे काही बोलणं झाले, त्या तुम्हीच.
माधवी: हो, मीच माधवी , माधवीने उसने अवसान आणून परत विचारले, "कसे आहात तुम्ही?"
माधव: हो, ठीक आहे, तुम्ही कशा आहात?
माधवी: मी पण ठीक आहे, तुम्ही आता ऑफिस मध्ये आहात का?
माधव : "हो, मी ऑफिस मध्ये आहे". माधव या सर्व बोलण्याने सुखावत चालला होता. जिच्या बद्दल तो आसुसलेला होता, तो प्रत्यक्ष आवाज त्याच्या कानातून थेट त्याच्या हृदयात शिरत होता. आता माधव ऑफिस मधून बाहेर आला, कानाला मोबाईल तसाच ठेवून तो अशा थाटात बाहेर आला, की ऑफिस मधल्या सर्वांना वाटावे काही महत्वाचं बोलणं चाललंय.
माधवी: हॅलो, जेवण झाले का तुमचे?
माधवीचा हा प्रश्न टिपिकल होता, बहुतेक लग्नाच्या मुली हा प्रश्न होणाऱ्या नवऱ्या विचारतात, त्यातून ती किती दक्ष आहे, हा भासवण्याचा प्रयत्न असतो. जीवनाच्या शेवट पर्यंत हे दोन 'घासाचे' महत्व सगळ्यांनाच असते.
पुन्हा माधव ऑफिसची कामे करण्यात मग्न झाला. परंतु माधवीच्या ओढीचा हळुवार स्पर्श अधून मधुन त्याला जाणीव करून देत होता. माधवला केव्हा एकदा ऑफीस मधून बाहेर पडतो आणि माधवी बरोबर लडिवाळ बोलणं करतो अशी इच्छा होत होती. ऑफीस सुटण्यापूर्वी माधवीचा एक कॉल येऊन गेला. त्या नुसत्या मिस कॉल ने सुद्धा माधव शहारून गेला होता.
बस मधून माधव परत माधवीच्या कॉल ची प्रतीक्षा करत बसच्या खिडकीतून बाहेर पाहत होता, त्याच्या नजरे समोर माधवीचे कल्पित रूप रेंगाळत होत. बाहेर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर मुलींमध्ये त्याला माधवीचे कल्पितरूप दिसत होते. त्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्न उपस्थित होत होते, ती कशी दिसत असेल, अशी की तशी? कारण त्याने अजून माधवीला पाहिलं नव्हतं. त्यामुळे वेगवेगळ्या चेहऱ्याच्या मुली रस्त्यावरून पाहताना, नकळत माधवी डोकावत होती.
पण अजून माधवीचा कॉल आला नव्हता, त्यामुळे माधव अस्वस्थ होत चालला होता. जीवनातील नवीन प्रितीची ओढ फार विलक्षण असते. माधव मूळात हळव्या स्वभावाचा होता. त्यामुळे तो अशांत मनस्थितीत होता. आता त्याला प्रेमाची ओढ काय असते हे उमजत चालले होते. प्रेमाच्या तीव्रतेची धग त्याच्या मनाला हळुवार चटके देत होती.
प्रेमाची ही सुरुवात माधव आणि माधवीच्या जीवनात किती गोड, किती विलक्षण होती. अजून एकमेकांना प्रत्यक्ष पाहिलेही नव्हते, पण मनाने दोघेही एकमेकांत गुंतत चालले होते. एकमेकांचा आवाजच जणू त्यांच्या हृदयाचा ठोका ठरला होता. जणू जीवनातली सारी वाटचाल आता त्या आवाजाच्या सुरावटीवर अवलंबून होती.
माधवच्या मनात एक अनामिक ऊब पसरत होती. साध्या "जेवण झाले का?" या प्रश्नामध्येही त्याला माधवीची काळजी, तिचं ममत्व दिसत होतं. एवढ्या लहानशा वाक्यातही ती आयुष्यभराची सोबत देईल, असा दिलासा दडलेला भासत होता.
माधवीसाठीही हे तसंच होतं. तिला वाटत होतं की माधव हा तिच्या जीवनातील तोच साथीदार आहे, जो तिच्या प्रत्येक हास्यामध्ये सामील होईल, आणि तिच्या प्रत्येक अश्रूमध्ये खांदा देईल. आवाजामधूनच तिने माधवची साधी, प्रामाणिक, आणि हळवी वृत्ती ओळखली होती.
दोघांच्या मनात आता एकच ध्यास लागला होता—एकमेकांना भेटण्याचा, डोळ्यांनी डोळ्यांना भिडवण्याचा. या अपेक्षेतच प्रेमाची खरी गोडी होती. अजून न बोललेले शब्द, अजून न जपलेले क्षण, आणि अजून न उमगलेले भाव—सगळं काही जणू त्यांच्या हृदयात ओसंडून वाहत होतं.
प्रेम हे खरेतर अशाच लहानशा स्पर्शांतून, नजरभेटीतून, आणि हळुवार शब्दांतून उमलतं. माधव आणि माधवीच्या आयुष्यात आता हे प्रेम एक नवा अध्याय सुरू करणार होतं—जो त्यांना केवळ जोडणार नाही, तर एकमेकांत विलीन करून टाकणार होता.
माधव आणि माधवी आता रोज मोबाईल वर तासनतास बोलत होती. आश्चर्य हे होतं की अजून दोघांनी एकमेकांना पाहिलं नव्हतं. माधव ऑफिस मधून वेळ काढून, माधवीशी बोलत रहायचा. एकदा माधवी ने भेटण्याच्या साठी माधवला ऑफर केली,
माधवी: "मी तुम्हाला माधव म्हटलं तर चालेल ना?"
माधव: "हो, हो चालेल ना. विचारता काय यात?"
माधवी: "तुम्ही प्रथम आव- जाव बोलू नका हो, दुरावा वाटतो मला माधव"
माधव: "अहो सवय झाली आहे, कोणाही स्त्री बरोबर मी असेच बोलतो. सवयीचा गुलाम आहे, हया बोलण्याचा."
माधवी: "ते ठीक आहे, मी काय बाहेरची वाटते का तुम्हाला? अहो मी होणारी बायको आहे तुमची"
माधव: "सॉरी, सॉरी मला असं म्हणायचं नव्हतं."
माधवी: "हे आत्तापासून सॉरी सॉरी म्हणायचे सोडा, या सॉरी मधून बऱ्याच चुका होतात, नंतर सॉरी म्हणून मोकळं."
माधव, माधवीच्या या उत्तराने दचकला. त्याला माधवी ची शब्दांत पकडण्याची खुबी लक्षात आली. पण हुशार असण्याची चिन्ह माधवला दिसली. संसाराला अशी हुशार चाणाक्ष बायको प्रत्येकाला हवीशी वाटते.
माधव: "बरं बाबा, आत्तापासून तुला आव जावं नाही म्हणणार
माधवी : ठीक आहे, माधव मी काय म्हणते, आपण एकदा पण नाही भेटलो, आपण भेटू या का? म्हणजे एकमेकांच्या आवडी निवडी कळतील आपल्याला, भेटू यात का? माधव , प्लीज भेटूया न.
माधव: बर माधवी, भेटू या, पण कसे आणि कुठे? तू सांग माधवी, मला फक्त रविवारची सुट्टी असते, या रविवारी ठरवू.
माधवी: चालेल, पण माधव मला दूर यायला नाही जमणार. आई, ओरडेल आणि संध्याकाळी सहा वाजे पर्यंत घरात पोहोचले पाहिजे. भाऊ पण रागावेल. तुम्हीच या ना इकडे म्हणजे काही प्रश्नच नाही. मी सांगते तुम्हाला कुठे यायचं.
माधव: माधवी भेटायचं म्हणजे, लग्नाआधी अवघडच आहे, पण भेटू या. एक काम कर, तुझा तुला आवडणारा फोटो मला मोबाईल वर पाठव, म्हणजे ओळख पटेल. तसा तुझा फोटो पाहिलाय, पण घाई मध्ये. मी पण माझा फोटो तुझ्या सोबत शेअर करतो.
क्रमशः
0 टिप्पण्या